कानून के हाथ !! 48 वर्षांनंतर फरार आरोपीला शेवटी बेड्या! तारूण्यात केला गुन्हा, वृध्दापकाळात अटक

Foto
मुंबई गुन्हेगार गुन्हा करून पसार झाल्यानंतर पोलीस त्यांना शोधून काढतात. काही आरोपींना शोधायला अनेक वर्ष लागतात. कुलाबा पोलिसांनी अशाच एका फरार आरोपीला अटक केली आहे. तब्बल 48 वर्ष तो फरार होता. आरोपीने सध्या वयाची सत्तरी ओलांडली असून 48 वर्षांपूर्वी कुठला गुन्हा केला ते देखील त्याला आठवत नव्हते.

चंद्रशेखर मधुकर कालेकर असे आरोपीचे नाव आहे. सध्या त्याचे वय 71 वर्षे असून तो रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील करंजणी गावात रहात होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 1977 मध्ये आरोपी चंद्रशेखऱ याचे वय अवघे 23 वर्षे होते. 1977 साली त्याने एका महिलेवर धारदार चाकूने हल्ला केला होता. या हल्ल्यात महिला वाचली होती. त्याच्या विरोधात कुलाबा पोलीस ठाण्यात भारतीय दंड विधान संहितेच्या (आयपीसी) कलम 307 अन्वये हत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

दापोलीतून अटक

आरोपी चंद्रेशेखर राहत असलेली चाळ काही वर्षांपूर्वी पडली होती. त्यानंतर तो सांताक्रुज, गोरेगाव, माहीम, लालबाग, बदलापूर असे वास्तव्याचे ठिकाण बदलत होता. त्याचा कोणताही संपर्क क्रमांक नसल्याने त्याचा ठाव ठिकाणा मिळत नव्हता. त्याला सत्र न्यायालयाने फरार घोषीत केले होते. हा गुन्हा प्रलंबित होता. वरिष्ठांनी या गुन्ह्याचा तपास करून आरोपीला पकडण्याचे आदेश दिले होते. त्यामुळे मागील 6 महिन्यांपासून पोलीस त्याचा शोध घेत होते. निवडणूक आयोगाचे पोर्टल, वाहतूक (आरटीओ) विभागाचे पोर्टल, कोर्ट चेकर याद्वारे माहिती मिळवली असता आरोपी चंद्रशेखर कालेकर काही वर्षांपासून दापोलीत वास्तव्यास असल्याचे समजले. त्यानुसार कुलाबा पोलिसांच्या पथकाने दापोली जाऊन त्याचा शोध घेऊन अटक केली.

आरोपीला 48 वर्षांपूर्वीचे काहीच आठवेना

चंद्रशेखर कालेकर याने तारूण्यात गुन्हा केला होता. सुरवातीची काही वर्षे त्याने पोलिसांना चकमा दिला. त्यानंतर त्याने मुंबई सोडली आणि कोकणात स्थायिक झाला. पोलीस दारात आले तेव्हा आपण असे काय कृत्य केले होते हेच त्याला आठवत नव्हतं. 48 वर्षे उलटून गेल्यामुळे त्या घटनेचे विस्मरण झाले होते असे पोलिसांनी सांगितले. त्याला अटक करून न्यायालायत हजर करण्यात आले. पुढील तपास सुरू आहे. 

या पथकाने केली कारवाई

कुलाबा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुधाकर देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सचिन तावरे पोलीस हवालदार कुलकर्णी, वैरागर, इंगवले आदींच्या पथकाने 48 वर्षांपासून फरार असलेल्या आरोपीला ब़ेड्या ठोकल्या